‘सत्यमेव जयते — कुमनेव पराजयते!’ : तिरंगा धारणालयासाठी अ‍ॅड. कारभारी गवळी यांचा लोकसंकल्प

अहिल्यानगर, दि. ९ ऑक्टोबर २०२६ (विशेष प्रतिनिधी) : ‘सत्यमेव जयते — कुमनेव पराजयते!’ या वैचारिक घोषणेतून सत्य, समता आणि विवेकाच्या आधारावर समाजातील अन्यायकारक विचारांचा पराभव करण्याचा लोकसंकल्प पीपल्स हेल्पलाईनचे अध्यक्ष व ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी मांडला आहे. पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या ‘तिरंगा धारणालय’ विचारमोहिमेशी जोडलेल्या या घोषणेचा भावार्थ सत्याचा विजय आणि कुविचारांचा पराभव असा आहे. जातिभेद, स्त्रीदास्य, द्वेष, अंधश्रद्धा आणि जन्माधारित श्रेष्ठत्वाच्या मानसिकतेची चिकित्सा करून संविधानिक मूल्यांवर आधारित समाजनिर्मिती करण्याचा संदेश या लोकसंकल्पातून देण्यात आला आहे.

अ‍ॅड. गवळी यांच्या वैचारिक मांडणीत ‘कुरू–मनू–नथुराम’ या संदर्भांतून ‘कुमन’ ही संज्ञा तयार करण्यात आली आहे. जातीय श्रेष्ठत्व, स्त्रियांचे दुय्यम स्थान, अंधानुकरण आणि सत्ता, संपत्ती व प्रतिष्ठेसाठी इतरांवर वर्चस्व गाजविण्याच्या प्रवृत्तींचे प्रतीक म्हणून या संज्ञेचा वापर केला जातो. अन्यायकारक समजुतींचा पराभव हिंसा किंवा द्वेषातून नव्हे, तर ज्ञान, विवेक, संवाद आणि लोकशाही मार्गाने व्हावा, अशी या विचारमोहिमेची भूमिका आहे. स्वतःच्या समजुतींची तपासणी करणे, पुराव्यांच्या आधारे निर्णय घेणे, चूक मान्य करून सुधारणा स्वीकारणे आणि अन्यायाविरुद्ध कायदेशीर मार्गाने आवाज उठविणे, यांना या घोषणेत महत्त्व देण्यात आले आहे.

गवळी यांच्या एकात्मिक ज्ञान सिद्धान्तातील ‘धारणालय’ ही संकल्पना व्यक्तीच्या विचारांचा, अनुभवांचा, संस्कारांचा आणि मूल्यांचा संग्रह म्हणून मांडण्यात आली आहे. या धारणालयातील चुकीच्या किंवा भेदभावपूर्ण समजुती ओळखून त्यांची तपासणी करणे आणि आवश्यक बदल घडविणे, ही ‘रिकॉन्शिओ शासन’ संकल्पनेची दिशा आहे. यासाठी ‘ओळखा—तपासा—बदला’ ही प्रक्रिया महत्त्वाची मानण्यात आली आहे. ‘तिरंगा धारणालय’ संकल्पनेत भारतीय संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. लोकभक्ती म्हणजे समाज व सजीवांच्या कल्याणासाठी बांधिलकी, ज्ञानभक्ती म्हणजे पुराव्यांचा आदर आणि सत्यशोधन, तर कर्मभक्ती म्हणजे विचारांचे प्रत्यक्ष सेवाकार्यात रूपांतर, असा या त्रिसूत्रीचा आशय आहे.

जातिभेदमुक्त सामाजिक संबंध, स्त्री-पुरुष समानता, श्रमाचा सन्मान, गरजूंची मदत आणि सार्वजनिक संस्थांमध्ये पारदर्शकता व उत्तरदायित्व यांसाठी नागरिकांनी प्रत्यक्ष कृती करावी, असे या लोकसंकल्पातून सूचित करण्यात आले आहे. पाणी, माती, वृक्ष आणि जैवविविधतेचे संवर्धन करणे, सार्वजनिक हिताच्या उपक्रमांत सहभागी होणे आणि स्वतःच्या विचारांनाही चिकित्सेच्या कसोटीवर तपासणे, ही या संकल्पनेची व्यावहारिक रूपे आहेत. ‘कुमन-हार’ आणि ‘वंदे तिरंगा धारणालय’ या संकल्पनांना जोडणारी ही घोषणा नागरिकांनी आचरणात आणावी, असे आवाहन करण्यात आले आहे. स्वतःच्या धारणालयातील एक हानिकारक समजूत तपासणे, एक भेदभावपूर्ण सवय बदलणे आणि सार्वजनिक हिताचे एक काम हाती घेणे, यातून सत्य, विवेक आणि संविधाननिष्ठ सामाजिक परिवर्तनाची सुरुवात होऊ शकते.

या लोकसंकल्पाकरिता पीपल्स हेल्पलाईनचे कार्यकर्ते  सब्बन, प्रकाश थोरात, ॲड. अमित थोरात, राहुल आढाव, बाळासाहेब पालवे, आनंद आढाव, अशोक भोसले, पोपट भोसले, वीर बहादुर प्रजापती, शाहीर कान्हू सुंबे, अभिमान शिंदे, बाबासाहेब भोसले, अमित थोरात आदी प्रयत्नशील आहेत.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना मोठा दिलासा; प्रमाणपत्राचा मार्ग मोकळा! फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; थेट खरेदीने एक मुस्त रक्कम स्वीकार अथवा अन्य मार्गांनी दिलेल्या भूस्वामींनाही लाभ