जन्माधारीत विषमता व द्वेषा आधारित मानसिकता विरोधात देशव्यापी अभियानाची घोषणा

​गांधी जयंतीपासून ‘ऑपरेशन डिच्चू फत्ते’; ‘कुमन गव्हर्नन्स’विरोधात देशव्यापी अभियानाची घोषणा

​सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठेवरील दीर्घकालीन वर्चस्वाच्या ‘दिमागी कुमन’ मानसिकतेविरोधात पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेची भूमिका.

​अहिल्यानगर (दि. २९ सप्टेंबर): देशात गेल्या बारा वर्षांत ‘कुमन गव्हर्नन्स’ बळावल्याचा आरोप करत पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसद या संघटनांनी ‘ऑपरेशन डिच्चू फत्ते’ या देशव्यापी अभियानाची घोषणा केली आहे. महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर २०२६ पासून हे अभियान सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पीपल्स हेल्पलाईनचे अध्यक्ष व ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.

​ॲड. गवळी यांनी मांडलेल्या संकल्पनेनुसार, ‘कुमन’ (KUMAN) हा शब्द ‘कुरु’, ‘मनु’ आणि ‘नथुराम’ या तीन संदर्भांतून तयार करण्यात आला आहे. सत्तामोह, जन्माधारित श्रेष्ठत्व आणि द्वेषाधारित हिंसक असहिष्णुता या तीन नकारात्मक प्रवृत्तींची ही प्रतीकात्मक सामाजिक-राजकीय मांडणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कुरु—सत्तामोह आणि हक्क नाकारणे: या संकल्पनेत ‘कुरु’चा संदर्भ महाभारतातील दुर्योधनाच्या कौरवी सत्तामोहाशी जोडला आहे. सत्ता स्वतःच्या किंवा स्वतःच्या गटाच्या ताब्यातच राहावी असा आग्रह धरणे, इतरांचे न्याय्य हक्क नाकारणे आणि वर्चस्वासाठी नैतिक मर्यादा डावलणे, असा या प्रवृत्तीचा अर्थ गवळी यांनी मांडला.

मनु—जन्माधारित श्रेष्ठत्व आणि विषमता: मनुस्मृतीशी जोडलेली जातीय उतरंड आणि स्त्री-पुरुष असमानता यांचा येथे संदर्भ आहे. जन्मावरून माणसाला श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरवणे, परंपरेच्या नावाखाली विषमता टिकवून ठेवणे आणि इतरांच्या स्वातंत्र्यावर नियंत्रण आणणे, अशी ही मानसिकता आहे.

नथुराम—द्वेष आणि हिंसक असहिष्णुता: नथुराम गोडसेचा संदर्भ वैचारिक मतभेदांचे रूपांतर व्यक्तिद्वेषात करणे, विरोधकांचे अस्तित्व मान्य न करणे आणि हिंसेचे समर्थन किंवा गौरवीकरण करणे या प्रवृत्तींचे प्रतीक म्हणून वापरण्यात आला आहे.

या प्रवृत्ती व्यक्तीच्या रुजलेल्या धारणा, मूल्ये, सवयी आणि स्मृतींमध्ये स्थान मिळवून तिच्या भावनिक प्रतिक्रिया, निर्णय व व्यवहारांना दिशा देतात, अशी मांडणी ॲड. गवळी यांनी केली आहे. या विचारसंचाला ते ‘कुमन धारणालय’ म्हणतात. सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा यांवर आयुष्यभर स्वतःचे नियंत्रण टिकवून ठेवण्याला प्राधान्य देणे हे त्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे. अशा स्वार्थकेंद्रित कारभारामुळे लोककल्याण आणि सार्वजनिक उत्तरदायित्व दुय्यम ठरते, अशी टीका संघटनांनी केली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या सार्वजनिक भूमिकांवर टीका करत संघटनांनी त्यांना ‘दिमागी कुमन ऑफ इंडिया’ असे संबोधले आहे. सत्ता आणि संस्थांवरील नियंत्रण दीर्घकाळ टिकवण्याच्या मानसिकतेचे ते प्रतिनिधित्व करतात, असा आरोप संघटनांनी केला आहे. ‘दिमागी कुमन’ हा राजकीय टीकेतील शब्दप्रयोग असून, त्याद्वारे विचारपूर्वक स्वार्थकेंद्रित वर्चस्व जपणाऱ्या प्रवृत्तींवर आक्षेप व्यक्त करण्यात आला आहे.

​‘ऑपरेशन डिच्चू फत्ते’च्या माध्यमातून नागरिकांमध्ये संविधाननिष्ठ विवेक, सत्तेला प्रश्न विचारण्याचे धैर्य आणि सार्वजनिक उत्तरदायित्वाची जाणीव वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. ‘ओळखा–तपासा–बदला’ या सूत्रातून स्वतःच्या विचारांची आणि सार्वजनिक कारभाराची चिकित्सा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय यांवर आधारित ‘तिरंगा धारणालय’ रुजवणे, हे या अभियानाचे व्यापक उद्दिष्ट असल्याचे ॲड. गवळी यांनी सांगितले.

गांधी जयंतीपासून सुरू होणाऱ्या या अभियानात नागरिकांनी शांततामय, अहिंसक आणि घटनात्मक मार्गाने सहभागी व्हावे; तसेच सार्वजनिक पदाधिकाऱ्यांचे निर्णय, त्यांचा कारभार आणि लोकहिताप्रती त्यांची बांधिलकी यांची संविधानाच्या मूल्यांच्या आधारे चिकित्सा करावी, असे आवाहन पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना मोठा दिलासा; प्रमाणपत्राचा मार्ग मोकळा! फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; थेट खरेदीने एक मुस्त रक्कम स्वीकार अथवा अन्य मार्गांनी दिलेल्या भूस्वामींनाही लाभ