
वाळुंज येथून श्रमदान आणि ‘ईर्जिक फार्मिंग पर्वा’चा प्रारंभ; दख्खन पठारावर जलसंधारण व ओलावा संवर्धनाची मोहीम – ॲडव्होकेट कारभारी गवळी
अहिल्यानगर | विशेष प्रतिनिधी:- संभाव्य पाणीटंचाईच्या संकटावर मात करण्यासाठी, शेतकऱ्यांना जलसुरक्षेचा आधार देण्यासाठी आणि लोकसहभागातून भूजल स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेच्या वतीने ‘नाम-सेवा’ (NAM-SEVA) उपक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत अहिल्यानगर तालुक्यातील वाळुंज गावातून ‘श्रमदान आणि ईर्जिक फार्मिंग पर्वा’ला प्रारंभ करण्यात येणार असून, दख्खन पठारातील दुष्काळप्रवण भागांमध्ये जलसंधारण, मृद्संवर्धन आणि वृक्षसंवर्धनाची लोकचळवळ उभी करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या पुढाकारातून कार्यरत असलेल्या नाम फाउंडेशनने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणे आणि जलसंधारणाच्या माध्यमातून ग्रामीण भागाला दिलासा देणे यासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. याच सेवाभावी विचारातून प्रेरणा घेत, केवळ भावनिक श्रद्धांजलीपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष श्रमदान आणि जलसंवर्धनाच्या कामातून शेतकरीहिताचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार संघटनांनी व्यक्त केला आहे.
वाळुंजमधून लोकसहभागाच्या जलचळवळीला सुरुवात! नगर तालुक्यातील वाळुंज गावात ग्रामस्थ, शेतकरी, युवक, महिला आणि स्वयंसेवक यांच्या सहभागातून स्थानिक परिस्थितीला अनुरूप जलसंधारणाची कामे हाती घेण्याचे नियोजन आहे. पावसाचे पाणी जमिनीत जिरवणे, शेतबांधांची दुरुस्ती व मजबुतीकरण, वाहून जाणारी माती आणि गाळ अडवणे, वृक्षांचे संरक्षण करणे आणि शेतीतील ओलावा टिकवणे यांसारख्या उपायांवर भर दिला जाणार आहे. या उपक्रमात श्रमदानाला केवळ एक दिवसाची मोहीम न मानता, गावाच्या जलसुरक्षेसाठी सातत्याने राबविण्यात येणारी लोकचळवळ बनविण्याचा प्रयत्न असेल. जलसंधारणाच्या कामांची नियमित देखभाल आणि त्यांचा शेतीला प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे, हेही उपक्रमाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.
‘ईर्जिक फार्मिंग’मधून जमिनीतील ओलावा संवर्धन
‘ईर्जिक फार्मिंग पर्वा’च्या माध्यमातून जलसंधारणाची कामे शेती आणि वृक्षसंवर्धनाशी जोडली जाणार आहेत. पाऊस, मातीचा प्रकार, जमिनीचा उतार, उपलब्ध जलस्रोत आणि स्थानिक भौगोलिक परिस्थिती यांचा विचार करून पाणी अडविणे, जिरविणे आणि उपलब्ध ओलाव्याचा कार्यक्षम वापर करणे यावर भर दिला जाईल.
भूमिगत ‘ओलाशय’ ही संकल्पना पुढे नेत पिकांच्या आणि वृक्षांच्या मुळांच्या परिसरात ओलावा अधिक काळ टिकविण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढविणे, पिकांच्या अवशेषांचे आच्छादन करणे, बाष्पीभवन कमी करणे आणि गरजेनुसार सूक्ष्म सिंचनाचा वापर करणे यांसारख्या उपायांचा विचार केला जाणार आहे.
स्थानिक भूगर्भरचना आणि तांत्रिक परिस्थितीनुसार समतल चर, शेतबांध, लहान जलसंधारण रचना आणि गाळ अडविणाऱ्या उपायांची निवड करण्यात येईल. भूजल पुनर्भरणाची कामे करताना योग्य तांत्रिक मार्गदर्शन घेऊन जमिनीची स्थिती आणि भूजलाची गुणवत्ता यांचाही विचार केला जाणार आहे.
पाण्याच्या उपलब्धतेची नियमित नोंद,भूजल स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी केवळ जलसंधारणाच्या रचना उभारणे पुरेसे नसून, त्यांचे परिणाम तपासणेही आवश्यक आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण, मातीतील ओलावा, विहिरींच्या पाणीपातळीतील बदल, सिंचनासाठी होणारा पाण्याचा वापर आणि उन्हाळ्यात टिकून राहिलेल्या वृक्षांची स्थिती यांची नियमित नोंद ठेवण्यावर भर दिला जाणार आहे.
या नोंदींच्या आधारे कोणत्या उपायांचा अधिक फायदा झाला, कोणत्या ठिकाणी सुधारणा आवश्यक आहे आणि उपलब्ध पाण्याचा अधिक कार्यक्षम वापर कसा करता येईल, याचा अभ्यास करता येईल. वाळुंज येथील अनुभवांचा उपयोग पुढील गावांमध्ये स्थानिक गरजांनुसार जलसंधारणाचे आराखडे तयार करण्यासाठी केला जाणार आहे.
दख्खन पठारावर भूजल स्वराज्याची दिशा ठरेल!
दख्खन पठारातील अनेक गावांना अनियमित पाऊस, भूजलपातळीतील घट आणि शेतीसाठी पाण्याची वाढती गरज या समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत गावपातळीवर पाण्याचे नियोजन, सामूहिक श्रमदान, मातीतील ओलावा संवर्धन आणि जलस्रोतांची देखभाल यांना विशेष महत्त्व आहे.
वाळुंज गावातील कामांचे अनुभव आणि प्रत्यक्ष परिणाम विचारात घेऊन हा उपक्रम टप्प्याटप्प्याने अन्य दुष्काळप्रवण गावांमध्ये विस्तारण्याचा निर्धार पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेने व्यक्त केला आहे. स्थानिक लोकसहभाग, तांत्रिक मार्गदर्शन आणि नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत वापर यांच्या आधारे गावांना जलसुरक्षेच्या दिशेने स्वावलंबी बनविणे, हा या मोहिमेचा व्यापक हेतू आहे.
पीपल्स हेल्पलाईनचे प्रमुख कारभारी गवळी यांनी या उपक्रमाची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “शेतकरीसेवेची प्रेरणा प्रत्यक्ष कृतीत उतरविणे, हीच ‘नाम-सेवा’ची खरी दिशा आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब अडविणे, जमिनीत जिरविणे, मातीतील ओलावा जपणे आणि वृक्षांचे संरक्षण करणे यासाठी समाजाने एकत्र आले पाहिजे. श्रमदानाच्या माध्यमातून गावागावांत जलसुरक्षेची जाणीव निर्माण झाली, तर भूजल स्वराज्याच्या दिशेने ठोस पावले टाकता येतील.”
‘नाम-सेवा’ उपक्रमातून जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप देत शेतकरी, ग्रामस्थ आणि युवकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पाण्याचे संवर्धन, शेतीतील ओलावा आणि वृक्षांचे संरक्षण यांना एकाच सूत्रात बांधून दख्खन पठाराच्या शाश्वत विकासासाठी नवा कृतीशील मार्ग निर्माण करण्याची या मोहिमेची भूमिका आहे. या अभियानासाठी अशोक सब्बन, प्रकाश थोरात, ॲड. अमित थोरात, राहुल आढाव, बाळासाहेब पालवे, आनंद आढाव, अशोक भोसले, पोपट भोसले, वीर बहादुर प्रजापती, शाहीर कान्हू सुंबे, अभिमान शिंदे, बाबासाहेब भोसले, अमित थोरात आदी प्रयत्नशील आहेत.





