
अहिल्यानगर | प्रतिनिधी/-अलीकडे राम मंदिरात घडलेल्या कथित चोरीच्या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. धार्मिक स्थळांच्या सुरक्षेबाबत, आर्थिक पारदर्शकतेबाबत आणि सामाजिक जबाबदारीबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेश मिश्रा यांनी विशेष तपास यंत्रणा कडून चौकशी करण्यात येईल व कोणताही हलगर्जीपणा असणार नाहीत असे स्पष्ट केले. भाविकांनी श्रद्धेतून दिलेल्या दानाची अशा प्रकारे चोरी होणे म्हणजे देशाच्या दृष्टीने दुर्दैव आहे.
या पार्श्वभूमीवर 19व्या शतकातील थोर समाजसुधारक गोपाळ हरी देशमुख उर्फ ‘लोकहितवादी’ यांचे विचार पुन्हा प्रकर्षाने आठवत आहेत. कोण होते लोकहितवादी? जन्माने ब्राह्मण असूनही गोपाळ हरी देशमुख यांनी तत्कालीन वर्णव्यवस्था, जातिभेद, कर्मकांड आणि अंधश्रद्धेवर कठोर प्रहार केला. 1848 ते 1850 दरम्यान ‘प्रभाकर’ वृत्तपत्रात ‘शतपत्रे’ या नावाने त्यांनी 108 लेख लिहिले. त्यांचे ठाम मत होते की, “समाजातील श्रेष्ठत्व हे जन्मावर नव्हे तर ज्ञान, कर्तृत्व आणि नैतिकतेवर ठरले पाहिजे. धर्माचा उपयोग लोककल्याणासाठी व्हावा, लोकांच्या शोषणासाठी नव्हे.”

मंदिर की ज्ञानमंदिर? लोकहितवादींचा रोकडा सवाल
लोकहितवादींनी स्पष्ट शब्दांत सांगितले होते: “जर दान करायचे असेल, तर ते ज्ञानप्रसारासाठी, छापखाने सुरू करण्यासाठी, व्यापारवृद्धीसाठी, कारखाने उभारण्यासाठी आणि नवीन उपयुक्त शोधांसाठी वापरावे. हजारो रुपये खर्च करून मंदिरे बांधणे म्हणजे पैसा मातीमध्ये गाडण्यासारखे आहे.”
त्यांच्या मते इंग्रज अनेक उपयुक्त गोष्टी परदेशातून आणत आहेत, त्यामुळे येथील व्यापारी, विणकर आणि इतर लोकांना फायदा होऊ शकतो. “अशा विद्या येथे आणून लाखो लोकांचे कल्याण करण्याचे काम कोणी केले आहे का?” असा रोकडा सवाल त्यांनी तत्कालीन समाजाला विचारला होता.
चोरीची घटना – केवळ कायद्याची बाब नाही तर राम मंदिरातील कथित चोरीची घटना केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न नाही, तर ती समाजातील नैतिक अधःपतनाची गंभीर चेतावणी आहे, असे मत सामाजिक अभ्यासकांनी व्यक्त केले. लोकहितवादी म्हणतात त्याप्रमाणे, “धर्म आणि नैतिकता यांचा संबंध कृतीशी असला पाहिजे, केवळ बाह्य आडंबराशी नव्हे.”
धर्मस्थळे ही समाजाच्या विश्वासाची केंद्रे आहेत. तिथे चोरी होणे म्हणजे श्रद्धेलाच तडा जाणे. श्रद्धेच्या नावावर केवळ भावना व्यक्त करण्यापेक्षा व्यवस्थेतील त्रुटी दूर करणे अधिक महत्त्वाचे आहे.
काय हवी उपाययोजना? लोकहितवादींच्या विचारांशी सुसंगत उपाययोजना आजही तितक्याच महत्त्वाच्या आहेत,आर्थिक पारदर्शकता: धार्मिक संस्थांमध्ये नियमित लेखापरीक्षण सक्तीचे करावे. सुरक्षा व्यवस्था: सर्व धार्मिक स्थळी सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षक नेमणे बंधनकारक करावे. नागरिकांचा सहभाग: मंदिर समित्यांमध्ये सामान्य भाविकांना, महिलांना प्रतिनिधित्व द्यावे. सामाजिक उत्तरदायित्व: श्रद्धास्थानांचे रक्षण केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून समाजातील प्रत्येक घटकाची सामूहिक जबाबदारी आहे.
गुलामगिरीच्या वृत्तीवर प्रहार बोलतांना,लोकहितवादींना लोकांच्या गुलामगिरीच्या वृत्तीचीही खंत होती. “लोक इंग्रजांच्या आगमनाला स्वर्गातून इंद्र आल्यासारखे समजतात आणि त्यांच्यापासून घाबरतात. स्वतःच्या लोकांशी मात्र ते भांडतात, पण परकीयांच्या लाथाही सहन करतात,” अशी टीका त्यांनी केली होती. हा कमीपणा कशामुळे आला, याचे आत्मपरीक्षण आजही गरजेचे आहे.
सामाजिक स्तरावर पाहिले असता, राम मंदिरातील घटनेमुळे समाजाने आत्मपरीक्षण करण्याची गरज अधोरेखित होते. केवळ आरोपींना शिक्षा करून प्रश्न संपणार नाही; तर अशा घटनांना कारणीभूत असलेल्या सामाजिक आणि प्रशासकीय उणिवांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. लोकहितवादींनी 175 वर्षांपूर्वी मांडलेले विचार आजच्या काळातही दिशादर्शक ठरतात.






