पसायदानी स्वधर्मच मनुस्मृती गव्हर्नन्समधून लोकशाहीची मुक्ती करणार – ॲड. कारभारी गवळी

अहिल्यानगर : भारतीय लोकशाहीत मतदाराला संविधानाने सार्वभौम नागरिकाचा दर्जा दिला असला, तरी मनुस्मृती गव्हर्नन्स मतदाराला जात, धर्म, भीती, पाप-पुण्य, स्वर्ग-नरक आणि जन्माधारित श्रेष्ठ-कनिष्ठतेच्या अ-जनुकीय माहितीच्या गुलामगिरीत अडकवते. जातीय मतदान, मतांची विक्री आणि धार्मिक ध्रुवीकरण हे निवडणुकीतील साधे दोष नसून “मतदान अक्कलमारी”चे गंभीर प्रकार आहेत, असा आरोप पीपल्स हेल्पलाईनचे अध्यक्ष, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. कारभारी गवळी यांनी आज येथे केला.
पत्रकारांशी बोलताना ॲड. गवळी म्हणाले, “मतदान अक्कलमारी म्हणजे मतदाराच्या स्वतंत्र विचारशक्तीवर कब्जा करणे. मतदाराने संविधान, सार्वजनिक हित, समानता, न्याय, विज्ञान आणि मानवता यांच्या आधारे मतदान करणे अपेक्षित असते. परंतु मनुस्मृती गव्हर्नन्स मतदाराच्या मेंदूत जात, धर्म, देवभय, अंधश्रद्धा आणि जन्माधारित ओळखीचे कोड दीर्घकाळासाठी बसवते. त्यामुळे मतदार मतदानाचा अधिकार वापरतो; पण निर्णय मात्र त्याच्या स्वतंत्र विवेकातून नव्हे, तर पूर्वीपासून कोड झालेल्या अ-जनुकीय माहितीतून घेतो. हीच लोकशाहीतील अक्कलमारी आहे.”
मानसिक कोडिंग हेच खरे शस्त्र ते पुढे म्हणाले की, या अक्कलमारीची तंत्रे प्राचीन काळापासून वापरली गेली. दलित, शूद्र, स्त्रिया, गरीब आणि वंचित लोकांना मागील जन्मातील पाप, स्वर्गप्राप्ती, कर्मभोग आणि दैवी आदेश यांच्या नावाखाली अन्याय सहन करण्यास शिकवले गेले. “मनुस्मृती गव्हर्नन्सची खरी शक्ती कायद्यात किंवा शस्त्रात नसून या मानसिक कोडिंगमध्ये आहे.”

आधुनिक काळात जातीय समीकरणे, धार्मिक ध्रुवीकरण, भावनिक घोषणाबाजी, मंदिर-मशीद वाद, देवाच्या नावाने सत्ता, राष्ट्रवादाच्या नावाने प्रश्न विचारणाऱ्यांचे दमन आणि पैशाच्या जोरावर मतांची खरेदी यांद्वारे हेच तंत्र वापरले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
पसायदानी स्वधर्म हाच मार्ग या समस्येवर उपाय म्हणून ॲड. गवळी यांनी *पसायदानी स्वधर्म, एकात्मिक ज्ञान सिद्धांत आणि RECONSCIO गव्हर्नन्स* यांची मांडणी केली आहे. “संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानातील ‘कल्पतरू आरव’ म्हणजे प्रत्येक माणसातील ज्ञानाधारित, न्यूरोप्लास्टिक आणि सर्जनशील क्षमता आहे. तर ‘चेतना चिंतामणी’ म्हणजे त्या क्षमतेतून निर्माण होणारी विवेकपूर्ण, करुणामय आणि एकात्मिक गव्हर्नन्स आहे. ही प्रतीके केवळ भक्तीची नसून मानवी मेंदू, समाज आणि लोकशाही यांची अ-जनुकीय माहिती मुक्त करण्याची साधने आहेत,” असे ते म्हणाले.
“मनुस्मृती गव्हर्नन्स जन्मावर आधारित सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा आणि श्रेष्ठत्वाचे आरक्षण निर्माण करते. पण पसायदानी स्वधर्म मूलभूत कर्तव्यांवर आधारित जीवनशिस्त निर्माण करतो,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘ओळखा–तपासा–बदला’ मोहीम,मतदान अक्कलमारीचा प्रतिकार करण्यासाठी “ओळखा–तपासा–बदला” ही अ-जनुकीय माहिती सुधारणा मोहीम राबवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. प्रथम मतदाराने आपल्या मेंदूत बसले कोड ओळखावेत, नंतर ते संविधानाशी सुसंगत आहेत का ते तपासावेत आणि शेवटी ते बदलून पसायदानी स्वधर्मावर आधारित जीवन स्वीकारावे, असे आवाहन त्यांनी केले.
“जातीय मतदान नको, मतविक्री नको, धार्मिक ध्रुवीकरण नको, मनुस्मृती गव्हर्नन्स नको. मतदान अक्कलमारीच्या विरोधात अ-जनुकीय माहिती क्रांती हवी. संविधानाच्या बाह्य लोकशाहीला पसायदानी स्वधर्माची अंतःकरणातील लोकशाही जोडली, तरच भारतीय जनता मनुस्मृती गुलामगिरीतून मुक्त होईल,” असा निर्धार ॲड. गवळी यांनी व्यक्त केला.
आंदोलनासाठी ॲड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, ॲड. अमित थोरात, शाहीर कान्हू सुंबे, ॲड. लक्ष्मणराव पोकळे, वीरबहादूर प्रजापती, संतोष खामकर, ओम कदम, पोपट शेळके, धनंजय मडके, कैलास पठारे, ॲड. विद्या शिंदे, राजेंद्र कर्डिले, दिलीप घुले आणि प्रकाश गोसावी* आदी कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.





