अहिल्यानगर / प्रतिनिधी : संत ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदान हे केवळ भक्तिप्रार्थना नसून मानवी चेतना, मेंदूची कार्यप्रणाली, अ-जनुकीय माहिती (Non-Genetic Information) आणि विश्वकल्याणाचे जीवनविज्ञान मांडणारा ग्रंथ आहे, असे प्रतिपादन पीपल्स हेल्पलाईनचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. कारभारी गवळी यांनी केले.
त्यांच्या मते, पसायदानातील “चेतना चिंतामणी” हे मानवी चेतनेचे जागृत केंद्र असून, एकाग्र लक्ष, विवेक आणि निर्णयक्षमतेचे प्रतीक आहे. व्यक्ती ज्या विषयावर सखोल चिंतन करते, त्या दिशेने परिवर्तनाची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे चेतना चिंतामणी ही अंतर्गत जीवन-गव्हर्नन्सची प्रेरक शक्ती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच “कल्पतरू आरव” हे मानवी मेंदूतील न्यूरोप्लास्टिसिटीचे प्रतीक असल्याचे सांगताना त्यांनी म्हटले की, शिक्षण, अनुभव, भाषा, संस्कार, स्मृती आणि मूल्यांच्या स्वरूपातील अ-जनुकीय माहितीचा प्रचंड साठा मेंदूत निर्माण होत असतो. नवीन परिस्थिती किंवा समस्यांचा सामना करताना हा माहितीसाठा सक्रिय होऊन योग्य निर्णय घेण्यास मदत करतो.
अॅड. गवळी यांच्या मते, चेतना चिंतामणी आणि कल्पतरू आरव यांची एकात्मता व्यक्तीच्या अंतर्गत जीवन-गव्हर्नन्सची मूलभूत रचना आहे. चेतना दिशा देते, तर मेंदूतील माहिती प्रक्रिया निर्णय घडवते. या समन्वयातून विवेकाधिष्ठित जीवनशैली विकसित होते.
त्यांनी पुढे सांगितले की, जातीयता, अंधश्रद्धा, स्त्रीदास्य, मतदास्य, भेदभाव आणि निसर्गशोषण या जन्मजात प्रवृत्ती नसून सामाजिक अनुभवातून निर्माण झालेल्या मानसिक संरचना आहेत. शिक्षण, चिंतन आणि आत्मपरीक्षणाच्या माध्यमातून त्या बदलणे शक्य आहे. “ओळखा – तपासा – बदला” ही परिवर्तनाची त्रिसूत्री असल्याचे त्यांनी नमूद केले.
पसायदानातील “दुरितांचे तिमिर जावो”, “विश्व स्वधर्म सूर्ये पाहो” आणि “जे खळांची व्यंकटी सांडो” या ओव्यांचा अर्थ अज्ञान, अन्याय आणि भेदभाव दूर करून विवेक, मानवता आणि निसर्गनिष्ठ जीवनमूल्यांचा स्वीकार असा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हवामानबदल, युद्धे, धार्मिक ध्रुवीकरण, सामाजिक विषमता आणि पर्यावरणीय संकटे यांसारख्या जागतिक आव्हानांवर मात करण्यासाठी बाह्य व्यवस्थेबरोबरच व्यक्तीच्या अंतर्गत मूल्यव्यवस्थेत परिवर्तन आवश्यक आहे. संविधान समाजाला दिशा देते, तर पसायदान अंतःकरणाला दिशा देते. या दोन्हींचा समन्वय मानवकेंद्रित, न्यायनिष्ठ आणि निसर्गपूरक समाजनिर्मितीसाठी महत्त्वाचा ठरू शकतो, असे अॅड. कारभारी गवळी यांनी सांगितले.






