संविधान ही बाह्य दिशा आणि पसायदान ही अंतःकरणातील दिशा मानून नव्या स्वधर्माची सामाजिक मांडणी:-अॅड. कारभारी गवळी 
पुणे : मनुस्मृती गव्हर्नन्सने भारतीय समाजातील विवेक, समता, बंधुता आणि सामाजिक ऊर्जा काळ्या विवरासारखी आत खेचली; तर संत ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदान हे मानवता, निसर्ग आणि सर्व जीवसृष्टीच्या कल्याणासाठी नवा सामाजिक बिग बँग ठरू शकते, असे क्रांतिकारक प्रतिपादन पीपल्स हेल्पलाईनचे अध्यक्ष, ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. कारभारी गवळी यांनी केले.

ते म्हणाले की, “मनुस्मृती समाजाचे ब्लॅक होल आहे; कारण ती जन्माधारित श्रेष्ठत्व, जातीय भिंती, स्त्रीदास्य, मतदास्य, अंधश्रद्धा आणि सत्ताकेंद्रित मानसिक गुलामी निर्माण करते. अशा गव्हर्नन्समध्ये व्यक्तीचा विवेक, समाजाची समता आणि निसर्गाविषयीची जबाबदारी नष्ट होते. उलट पसायदान समाजासाठी बिग बँग आहे; कारण ते व्यक्तीच्या अंतःकरणातून विश्वकल्याणाची ऊर्जा निर्माण करते.”
अॅड. गवळी यांच्या मते, इतर अनेक धार्मिक व्यवस्थांमध्ये सामूहिक कर्तव्यांची घोषणा केली जाते; मात्र प्रत्यक्ष लाभ वैयक्तिक मोक्ष, प्रतिष्ठा, सत्ता किंवा समूहहितासाठी घेतले जातात. समाज, निसर्ग, दुर्बल घटक आणि जीवसृष्टीबद्दलची प्रत्यक्ष जबाबदारी अनेकदा मागे पडते. त्यामुळे धर्माचे रूप कर्तव्याऐवजी लाभाच्या व्यवस्थेत बदलते.

“पसायदानी स्वधर्म मात्र याच्या पूर्ण विरुद्ध आहे. तो व्यक्तीला विचारतो—तू समाजाकडून काय घेतोस एवढेच नव्हे, तर तू समाजाला, निसर्गाला आणि जीवसृष्टीला काय परत देतोस? म्हणूनच पसायदानी स्वधर्म हा श्रद्धेचा विषय नसून कर्तव्याचा जीवन-मंडेट आहे,” असे अॅड. गवळी यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, पसायदानातील “दुरितांचे तिमिर जावो”, “विश्व स्वधर्म सूर्ये पाहो” आणि “जो जे वांछील तो ते लाहो” ही वचने केवळ भक्तिप्रार्थना नाहीत. ती व्यक्तीच्या अ-जनुकीय माहितीत, चेतनेत, विचारात आणि वर्तनात परिवर्तन घडविणारी मूलभूत कर्तव्ये आहेत. या कर्तव्यांमधूनच जातिभेद, अंधश्रद्धा, पर्यावरणशोषण, स्त्रीदास्य आणि मतदास्य संपविण्याची दिशा मिळते.
अॅड. गवळी म्हणाले की, “मनुस्मृती गव्हर्नन्स व्यक्तीला केंद्राभिमुख बनवते. ती सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा आणि जन्माधारित आरक्षणाचे संरक्षण करते. पसायदान व्यक्तीला केंद्रापसारक बनवते. ते व्यक्तीची ऊर्जा सर्व जीव, सर्व मानव आणि संपूर्ण निसर्गाच्या कल्याणाकडे प्रवाहित करते. म्हणूनच मनुस्मृती ब्लॅक होल आहे आणि पसायदान बिग बँग आहे.”

पसायदानी स्वधर्मात धर्म म्हणजे कर्मकांड नव्हे, तर कर्तव्य; कर्तव्य म्हणजे सेवा; आणि सेवा म्हणजे सर्वांच्या कल्याणासाठी स्वतःचे जीवन-गव्हर्नन्स उन्नत करणे, असे त्यांनी सांगितले. संविधान ही बाह्य दिशा आणि पसायदान ही अंतःकरणातील दिशा मानून नव्या स्वधर्माची सामाजिक मांडणी करणे ही काळाची गरज आहे, असेही त्यांनी नमूद केले.
शेवटी अॅड. गवळी म्हणाले की, “भारतीय समाजाने मनुस्मृतीच्या ब्लॅक होलमधून बाहेर पडून पसायदानाच्या बिग बँगकडे वाटचाल केली पाहिजे. हा संघर्ष कोणत्याही व्यक्ती किंवा धर्माविरुद्ध नाही; तो मानसिक गुलामी, जातीय गव्हर्नन्स, अंधश्रद्धा आणि निसर्गशोषणाविरुद्ध आहे. पसायदानी स्वधर्म प्रत्येक व्यक्तीला विश्वकल्याणाचा मिशन-मंडेट देतो. हाच भारताच्या नव्या सामाजिक पुनर्जन्माचा मार्ग आहे.”





