सामाजिक कार्यकर्ते प्रकाश थोरात यांचा हेल्पिंग हॅण्ड फाऊंडेशनतर्फे गौरवसमाजसेवा, संविधानिक मूल्ये आणि पर्यावरण संवर्धनासाठी केलेल्या कार्याचा सन्मान

अहिल्यानगर (प्रतिनिधी): पीपल्स हेल्पलाईनचे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश थोरात यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याचा गौरव हेल्पिंग हॅण्ड फाऊंडेशनच्या नर्सिंग कॉलेजच्या वतीने करण्यात आला. समाजातील वंचित, दुर्बल, पीडित आणि अन्यायग्रस्त घटकांच्या हक्कांसाठी सातत्याने केलेल्या कार्याची दखल घेत हा सन्मान करण्यात आला. यावेळी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हेल्पिंग हॅण्ड फाऊंडेशनच्या प्रमुख निर्मलाताई केदारी होत्या. त्यांच्या हस्ते प्रकाश थोरात यांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी फाऊंडेशनचे पदाधिकारी, नर्सिंग कॉलेजचे प्राध्यापक, विद्यार्थी आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात निर्मलाताई केदारी यांनी प्रकाश थोरात यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. त्या म्हणाल्या की, समाजातील गरजू, वंचित आणि अन्यायग्रस्त नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला आहे. निस्वार्थ भावनेने समाजहितासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींमुळेच सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया अधिक बळकट होत असते. अशा कार्यकर्त्यांचा सन्मान करणे म्हणजे समाजसेवेच्या मूल्यांचा गौरव होय.

जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना निर्मलाताई केदारी यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. वाढते प्रदूषण, जंगलतोड, हवामान बदल आणि पाणीटंचाई या समस्या संपूर्ण जगासमोर गंभीर आव्हान म्हणून उभ्या राहिल्या असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे, प्लास्टिकचा वापर कमी करावा, पाणी व विजेची बचत करावी तसेच स्वच्छतेच्या सवयी अंगीकाराव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

सत्काराला उत्तर देताना प्रकाश थोरात यांनी हेल्पिंग हॅण्ड फाऊंडेशन व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. संविधानिक मूल्यांचे जतन, सामाजिक न्यायाची अंमलबजावणी, शिक्षणाचे महत्त्व आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी यावर त्यांनी मार्गदर्शन केले. समाजातील दुर्बल व वंचित घटकांच्या हक्कांसाठी युवकांनी पुढाकार घेत सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमास अण्णासाहेब गायकवाड (केंद्रीय शिक्षक, भारतीय बौद्ध महासभा), शिवाजी जाधव सर, मंदा बडे मॅडम, अनिता वाघमारे मॅडम, सत्वशिला वाघमारे मॅडम, रावसाहेब रंधवे (माजी सहाय्यक महाव्यवस्थापक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ) आणि डेव्हिड औचित्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी सय्यद गौशिया, शेख मासिरा, शेख आलिया, सोनल शिरसाठ, शेख शबनूर, शेख अल्फीया, फातेमा सय्यद आणि माशिरा पठाण यांनी विशेष सहभाग नोंदविला. विद्यार्थिनींनी सामाजिक कार्य, आरोग्य सेवा आणि पर्यावरण संवर्धनाविषयी उत्सुकता व्यक्त करत समाजसेवेची प्रेरणा घेतली.

कार्यक्रमामुळे समाजसेवा, पर्यावरण संरक्षण आणि संविधानिक मूल्यांविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली असून उपस्थितांनी अशा उपक्रमांचे स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना मोठा दिलासा; प्रमाणपत्राचा मार्ग मोकळा! फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; थेट खरेदीने एक मुस्त रक्कम स्वीकार अथवा अन्य मार्गांनी दिलेल्या भूस्वामींनाही लाभ