तिरंगा हातात—RECONSCIO शासन मनात! ८ ऑगस्टला दिल्ली गेटवर ‘राष्ट्रीय धारणालय–RECONSCIO लोकशाही’चे ऐतिहासिक प्रात्यक्षिक

भारतीय तिरंगा ठरणार एकविसाव्या शतकातील संसदीय लोकशाहीची मूल्यघटना-अ‍ॅड. कारभारी गवळी 

 

अहिल्यानगर, ४ ऑगस्ट २०२६ : भारतीय तिरंगा आता केवळ राष्ट्राची ओळख, शासकीय समारंभांचे गौरवचिन्ह किंवा राष्ट्रप्रेमाची भावनिक अभिव्यक्ती राहणार नाही; तर तो एकविसाव्या शतकातील उन्नत भारतीय संसदीय लोकशाहीचे ‘राष्ट्रीय धारणालय’ आणि प्रत्येक नागरिक व लोकसेवकाच्या वर्तमानकालीन सजग कृतीचे ‘RECONSCIO शासन’ बनेल, अशी ऐतिहासिक संकल्पना ८ ऑगस्ट २०२६ रोजी अहिल्यानगरच्या दिल्ली गेट येथे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून देशासमोर मांडण्यात येणार आहे.

पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या या ‘तिरंगा सत्याग्रहा’त तिरंग्याच्या तीन रंगांना आणि अशोकचक्राला भारतीय लोकशाहीच्या चार मूलभूत शासनमूल्यांशी जोडण्यात येणार आहे.

तिरंग्यातील केशरी रंग लोकभक्तीचा—जनता, सर्व सजीवसृष्टी आणि निसर्गाच्या कल्याणासाठी निःस्वार्थ समर्पणाचा संदेश देईल. पांढरा रंग ज्ञानभक्तीचा—सत्य, विज्ञान, विवेक, चिकित्सक विचार आणि सातत्याने अद्ययावत होणाऱ्या ज्ञानाचे प्रतीक ठरेल. हिरवा रंग कर्मभक्तीचा—प्रामाणिक, कार्यक्षम, परिणामकारक आणि लोककल्याणकारी कृतीची प्रेरणा देईल. तर मध्यभागी असलेले अशोकचक्र संविधानिक नैतिकता, समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय आणि कायद्याच्या राज्याच्या अखंड गतिशीलतेचे प्रतीक म्हणून स्वीकारले जाईल.

ही चारही मूल्ये नागरिकांच्या आणि लोकसेवकांच्या सामूहिक स्मृतीत, विचारांत आणि संस्कारांत दृढपणे रुजणे म्हणजे राष्ट्रीय धारणालय; तर वर्तमान क्षणी त्यांची जाणीवपूर्वक तपासणी करून सार्वजनिक निर्णय आणि कृतीत अंमलबजावणी करणे म्हणजे RECONSCIO शासन, अशी या संकल्पनेची भूमिका आहे.

८ ऑगस्ट रोजी हातात तिरंगा उंच धरणारा प्रत्येक नागरिक आणि लोकसेवक हा केवळ राष्ट्रप्रेम व्यक्त करणार नाही; तर लोकभक्ती, ज्ञानभक्ती, कर्मभक्ती, संविधानिक नैतिकता आणि कायद्याचे राज्य यांनुसार सार्वजनिक जीवन जगण्याची प्रतिज्ञा करेल.

“हा राष्ट्रीय तिरंगा—हा लोकसेवक!” या घोषणेतून प्रत्येक सार्वजनिक पदाधिकाऱ्याला जनतेसमोर नैतिक कसोटीवर उभे करण्यात येईल. तिरंग्याची शपथ घेणाऱ्या व्यक्तीच्या निर्णयात लोकहित नसेल, ज्ञानाचा आधार नसेल, कृतीची परिणामकारकता नसेल किंवा संविधाननिष्ठा नसेल, तर तिचे तिरंगाप्रेम केवळ प्रतीकात्मक ठरेल, असा स्पष्ट संदेश या आंदोलनातून दिला जाणार आहे.

प्रत्येक मतदाराने मतदान करताना उमेदवाराच्या जात, धर्म, पैसा, घराणेशाही, प्रसिद्धी किंवा व्यक्तिपूजेऐवजी त्याची लोकभक्ती, ज्ञानभक्ती, कर्मभक्ती आणि संविधाननिष्ठा तपासली पाहिजे. त्याचप्रमाणे प्रत्येक निवडून आलेल्या प्रतिनिधीने आणि प्रशासकीय लोकसेवकाने प्रत्येक निर्णय राष्ट्रीय धारणालयाच्या कसोटीवर घेतला पाहिजे, अशी मागणी करण्यात येणार आहे.

व्यक्तीचे स्वशासन आणि राष्ट्राचे लोकशाही शासन या दोन्हींचा पाया एकाच उन्नत धारणालयावर उभा राहिला, तर भारतीय संसदीय लोकशाही स्वार्थकेंद्री सत्तास्पर्धेतून बाहेर पडून लोककल्याणकारी, ज्ञानाधिष्ठित, कार्यक्षम, निसर्गनिष्ठ आणि संविधाननिष्ठ होऊ शकेल.

भारताने तिरंगा-आधारित ही मूल्यात्मक लोकशाही कार्यपद्धती प्रत्यक्षात आणली, तर जगासमोर एकविसाव्या शतकातील संसदीय लोकशाहीचे अभिनव आणि उन्नत प्रारूप उभे राहील. राष्ट्रध्वज, नागरिकांचे अंतर्गत धारणालय आणि वर्तमानकाळातील सजग शासन यांची अशी सांगड घालणारा भारत हा जगातील पहिला देश ठरू शकतो, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

साठी ॲड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, ॲड. अमित थोरात, शाहीर कान्हू सुंबे, ॲड. लक्ष्मणराव पोकळे, वीरबहादूर प्रजापती, संतोष खामकर, ओम कदम, पोपट शेळके, धनंजय मडके, कैलास पठारे, ॲड. विद्या शिंदे, राजेंद्र कर्डिले, दिलीप घुले, प्रकाश गोसावी यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी आहे.

पीपल्स हेल्पलाईनचे अध्यक्ष ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी म्हटले आहे की, “तिरंगा उंच धरणे म्हणजे केवळ देशाचा जयघोष करणे नव्हे; तर स्वतःच्या विचारांवर, निर्णयांवर आणि कृतीवर लोकभक्ती, ज्ञानभक्ती, कर्मभक्ती आणि संविधानिक नैतिकतेचे शासन स्वीकारणे होय. राष्ट्रीय धारणालय आणि RECONSCIO शासन हीच एकविसाव्या शतकातील भारतीय संसदीय लोकशाहीची नवी ओळख ठरेल.”

तिरंगा हातात—RECONSCIO शासन मनात! राष्ट्रीय धारणालयातून उन्नत लोकशाही भारतात! हा राष्ट्रीय तिरंगा—हा लोकसेवक!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना मोठा दिलासा; प्रमाणपत्राचा मार्ग मोकळा! फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; थेट खरेदीने एक मुस्त रक्कम स्वीकार अथवा अन्य मार्गांनी दिलेल्या भूस्वामींनाही लाभ