निसर्ग सेवापाल सज्ज; पाऊस अडवा, पाणी जिरवा, भूमिगत ओलाशय वाढवा!

पुणे / अहिल्यानगर : एल निनोच्या संभाव्य तीव्र परिणामांना आणि जागतिक तापमानवाढीच्या वाढत्या संकटाला सामोरे जाण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसद यांच्या वतीने “राष्ट्रीय निसर्ग सेवा योजना” जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत देशभरात विद्यार्थी, तरुण, महिला बचत गट, ग्रामपंचायती, शहरी वॉर्ड आणि जनसंघटनांच्या सहभागातून निसर्गसेवेची व्यापक लोकचळवळ उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
या उपक्रमाची घोषणा करताना पीपल्स हेल्पलाईनचे अध्यक्ष ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. कारभारी गवळी यांनी सांगितले की, “आपण या पृथ्वीवर निसर्गाच्या जीवन-भाडेकराराखाली राहतो. निसर्गाने आपल्याला जमीन, पाणी, हवा, ऊर्जा, अन्न आणि जीवनासाठी आवश्यक सर्व काही दिले आहे. त्यामुळे निसर्गाचे सेवा-भाडे फेडणे ही प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी आहे. राष्ट्रीय निसर्ग सेवा योजना ही त्याच कर्तव्याची लोकघोषणा आहे.”
एल निनो आणि तापमानवाढीचे दुहेरी संकटआहे. यंदा एल निनोचा प्रभाव गंभीर होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर जागतिक तापमानवाढ, अनियमित पाऊस, भूजल पातळीतील घट आणि शहरी उष्णता बेटांची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे. भारतातील अनेक शहरे आज सिमेंटच्या जंगलात रूपांतरित झाली आहेत. काँक्रीटचे रस्ते, काँक्रीटच्या इमारती आणि काँक्रीटच्या भिंतींमुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरत नाही. परिणामी पाणी वाहून जाते, उष्णता वाढते, भूजल पातळी खोल जाते आणि निसर्गाचा समतोल बिघडतो.
ॲड. गवळी यांच्या मते, हे केंद्राभिमुख NGI संकुचनाचे लक्षण असून निसर्गाच्या नेगेन्ट्रॉपी चक्राचा ऱ्हास आहे. या स्थितीला उत्तर म्हणून IKT म्हणजेच एकात्मिक ज्ञान सिद्धांताच्या आधारे “ओळखा — तपासा — बदला” ही त्रिसूत्री राष्ट्रीय निसर्ग सेवा योजनेत मांडण्यात आली आहे.
IKT चे त्रिसूत्र : ओळखा, तपासा, बदला असे असून या योजनेनुसार प्रथम नागरिकांनी आपल्या परिसरातील सिमेंट जंगल ओळखावे. पाण्याचा निचरा कुठे अडतो, पावसाचे पाणी कुठून वाहून जाते, उष्णता कुठे साचते आणि जमीन कुठे उघडी आहे, याचा अभ्यास करावा.
त्यानंतर Rain Gain Battery तत्त्वानुसार आपल्या परिसरात बारमाही भूमिगत ओलाशय निर्माण करण्यासाठी कोणती जागा योग्य आहे, हे तपासावे. शेवटी त्या जागेचे हरित परिवर्तन करावे. एक काँक्रीट पृष्ठभाग हरित आच्छादनात, एक गच्ची टेरेस गार्डनमध्ये आणि रस्त्याकडची मोकळी जागा सदाहरित जीवनराईत रूपांतरित करणे, हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
राष्ट्रीय निसर्ग सेवा योजनेचे प्राथमिक लक्ष्य दहा कोटी लोकांचा सहभाग मिळविण्याचे आहे. प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक तरुण, प्रत्येक महिला बचत गट, प्रत्येक ग्रामपंचायत आणि प्रत्येक शहरी वॉर्डाने या योजनेत सक्रिय भूमिका घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
या योजनेत विद्यार्थ्यांना “निसर्ग सेवापाल” म्हणून जोडले जाणार आहे. प्रत्येक शाळेत NGI modification अंतर्गत निसर्ग सेवा उपक्रम राबविण्याचा प्रस्ताव आहे. तरुणांनी Rain Gain Battery युनिटची बांधणी आणि देखभाल करावी. महिला बचत गटांनी Foodicine, जैवविविधता आणि हरित जीवनशैली अभियानात पुढाकार घ्यावा. ग्रामपंचायतींनी प्रत्येक गावात किमान एक DHANRAI म्हणजेच सदाहरित जीवनराई उभारावी, तर शहरी वॉर्डांनी एक तरी काँक्रीट पृष्ठभाग हरित क्षेत्रात बदलण्याचा संकल्प करावा.
प्रत्येक विद्यार्थी — एक निसर्ग सेवापाल असेल भारताचे भविष्य असलेले कोट्यवधी विद्यार्थी या योजनेचे प्रमुख आधारस्तंभ असतील. “जर निसर्गच नष्ट झाला, तर भविष्य कसले?” असा प्रश्न उपस्थित करून ॲड. गवळी यांनी प्रत्येक विद्यार्थ्याने निसर्ग सेवापाल बनावे, प्रत्येक शाळेने निसर्ग सेवा केंद्र व्हावे आणि प्रत्येक जिल्ह्याने हरित क्रांती केंद्र बनावे, असे आवाहन केले.
एल निनोच्या संभाव्य तीव्र प्रभावाच्या पार्श्वभूमीवर शाळेतील गणवेशासोबत निसर्ग सेवेचा बिल्ला लावणे ही विद्यार्थ्यांच्या पर्यावरणीय जबाबदारीची सार्वजनिक खूण ठरावी, अशी संकल्पना या योजनेत मांडण्यात आली आहे.
Rain Gain Battery — मुख्य कृती कार्यक्रम असल्याने पीपल्स हेल्पलाईनच्या जनलोक चळवळीने १० जून २०२६ रोजी Rain Gain Battery चा प्रत्यक्ष प्रयोग पूर्ण केला. हा प्रयोग IKT च्या केंद्रोत्सारी नेगेन्ट्रॉपी तत्त्वाचा लोकाभिमुख आणि प्रत्यक्ष उपयोगी नमुना असल्याचे सांगण्यात आले.
Rain Gain Battery म्हणजे पावसाचे वाहून जाणारे पाणी जमिनीत जिरवून भूमिगत ओलाशय तयार करण्याची साधी, स्वस्त आणि परिणामकारक पद्धत आहे. यामुळे भूजल पातळी सुधारण्यास, झाडांना बारमाही ओलावा मिळण्यास, उष्णता कमी होण्यास आणि परिसरात हरित आच्छादन वाढण्यास मदत होऊ शकते.
आता हे तंत्रज्ञान प्रत्येक शाळेत, प्रत्येक ग्रामपंचायतीत आणि प्रत्येक शहरी वॉर्डात पोहोचविणे, हाच राष्ट्रीय निसर्ग सेवा योजनेचा मूलाधार असल्याचे ॲड. गवळी यांनी स्पष्ट केले.
जनतेसाठी घोषणा निसर्ग आपला माता-पिता आहे — आपण त्याचे भाडेकरू आहोत!पावसाचे पाणी अडवा आणि जिरवा — भूमिगत ओलाशय वाढवा!सिमेंट जंगलाचे हरित जंगलात रूपांतर करा!एल निनोला उत्तर द्या — निसर्ग सेवेने!प्रत्येक विद्यार्थी निसर्ग सेवापाल — प्रत्येक शाळा निसर्ग सेवा केंद्र!
राष्ट्रीय आवाहन पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसद यांच्या वतीने देशातील नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, तरुण, महिला बचत गट, ग्रामपंचायती, शहरी स्थानिक संस्था आणि सामाजिक संघटनांना या राष्ट्रीय निसर्ग सेवा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या मोहिमेसाठी ॲड. कारभारी गवळी, प्रकाश थोरात, अशोक सब्बन, ॲड. अमित थोरात, शाहीर कान्हू सुंबे, ॲड. लक्ष्मणराव पोकळे, वीरबहादूर प्रजापती, संतोष खामकर, ओम कदम, पोपट शेळके, धनंजय मडके, कैलास पठारे, ॲड. विद्या शिंदे, राजेंद्र कर्डिले, दिलीप घुले, प्रकाश गोसावी यांच्यासह अनेक कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.
“सरकारच्या योजना महत्त्वाच्या आहेत; परंतु निसर्ग वाचविण्यासाठी लोकसहभाग अनिवार्य आहे. एल निनो, तापमानवाढ, पाणीटंचाई आणि सिमेंट जंगल यांना उत्तर फक्त घोषणांनी मिळणार नाही. प्रत्येक नागरिकाने निसर्ग सेवापाल बनून प्रत्यक्ष कृती करणे, हीच काळाची गरज आहे,” असे ॲड. कारभारी गवळी यांनी म्हटले आहे.





