राहुरीत शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्याचे वाटप; शासनाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

राहुरी, प्रतिनिधी :जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सडे (ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) येथे १५ जून रोजी नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. यावेळी शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग, राहुरी येथील अभियंता पूनम थोरात होत्या. प्रमुख उपस्थितीमध्ये हर्षदा पेरणे आरोग्य विभाग तसेच शाळेचे मुख्याध्यापक विनायक हरिदास पानसंबळ, श्री. बाळासाहेब कल्हापुरे, शिक्षकवृंद, कर्मचारी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी अभियंता पूनम थोरात यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत मन लावून अभ्यास करण्याचा संदेश दिला. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी शिक्षण, शिस्त, स्वावलंबन आणि उज्ज्वल भविष्यासाठी परिश्रमाचे महत्त्व सांगितले. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे विद्यार्थी आनंदित झाले आणि त्यांना अभ्यासाचा पहिलाच प्रेरणादायी धडा मिळाला.

कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक विनायक हरिदास पानसंबळ तसेच शिक्षकवृंदांनी उत्कृष्टरीत्या केले होते. विद्यार्थ्यांचे स्वागत, साहित्य वाटप आणि कार्यक्रमाचे सुयोग्य आयोजन यामुळे उपस्थितांनी शाळेच्या कार्याचे कौतुक केले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व गणवेश उपलब्ध करून देणाऱ्या शासनाच्या या विद्यार्थीहिताच्या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले. नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात आनंददायी वातावरणात होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून शिक्षणाबद्दलची आवड अधिक वाढल्याचे चित्र यावेळी दिसून आले.






