‘पसायदान रेन गेन बॅटरी भागीरथी’ — मृत्यूनंतरच्या तेराव्याला जलसंवर्धनाची ऐतिहासिक श्रद्धांजली

पीपल्स हेल्पलाईनचे अध्यक्ष ज्येष्ठ विधीज्ञ     अ‍ॅड. कारभारी गवळी यांची संकल्पना 

 

अहिल्यानगर :-दुष्काळग्रस्त मातीत आयुष्यभर श्रम करणाऱ्या शेतकरी महिला स्व. भागीरथी निरदास गवळी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या तेराव्याच्या दिवशी एक ऐतिहासिक उपक्रम राबविण्यात येणार आहे. पारंपरिक कर्मकांडाऐवजी त्यांच्या आवडत्या झाडाजवळ ५ फूट × ५ फूट × ८ फूट खोल ‘पासायदान रेन गेन बॅटरी भागीरथी’ उभारून पावसाचे वाहून जाणारे पाणी जमिनीत साठविण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

या उपक्रमाची संकल्पना पीपल्स हेल्पलाईनचे अध्यक्ष ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी मांडली आहे. त्यांच्या मते, मृत व्यक्तीची खरी श्रद्धांजली केवळ विधी, फुले, धूप किंवा कर्मकांडांत नसून, तिच्या स्मृतीतून सजीव, निसर्ग, माती, पाणी आणि झाडांना जीवनदान देण्यात आहे.

स्व. भागीरथी निरदास गवळी यांनी आयुष्यभर कोरडवाहू शेतीत कष्ट केले. दुष्काळ, पाण्याची टंचाई आणि मातीतली कठोरता त्यांनी जवळून अनुभवली. म्हणूनच त्यांच्या स्मृतीत उभारली जाणारी ही रेन गेन बॅटरी केवळ जलसंधारणाचा प्रयोग नसून, एका शेतकरी स्त्रीच्या आयुष्यभराच्या मातृमय श्रमांची जिवंत स्मृती ठरणार आहे.

या बॅटरीसाठी झाडाजवळ खोल खड्डा घेऊन त्यात दगड, वाळू व जलझिरपणारी नैसर्गिक रचना तयार केली जाणार आहे. पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी या रचनेत वळविले जाईल. त्यामुळे पाणी जमिनीत साठेल, बाष्पीभवन कमी होईल, झाडांच्या मुळांना वर्षभर ओलावा मिळेल आणि आसपासची माती सुपीक व ओलसर राहण्यास मदत होईल.

ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानात “सर्व भूतांचे कल्याण होवो” ही सार्वत्रिक भावना आहे. त्याच भावनेला प्रत्यक्ष कृतीत उतरविणारा हा उपक्रम आहे. त्यामुळे या बॅटरीला ‘पासायदान रेन गेन बॅटरी भागीरथी’ असे नाव देण्यात आले आहे. ‘भागीरथी’ हे नावही या उपक्रमाला विशेष अर्थ देते. पुराणातील भगीरथाने गंगा पृथ्वीवर आणून पूर्वजांचे उद्धार आणि लोककल्याण साधले, तसेच स्व. भागीरथी गवळी यांच्या स्मृतीत पावसाचे पाणी जमिनीत नेऊन सजीवांचे कल्याण साधण्याचा हा आधुनिक भगीरथ प्रयत्न आहे.

अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी सांगितले की, “तेरावा हा केवळ मृतात्म्यासाठी विधी करण्याचा दिवस न राहता, निसर्गाला सेवा अर्पण करण्याचा दिवस झाला पाहिजे. मृतांच्या स्मृतीत झाडे, पाणी, माती आणि सजीवांसाठी उपयुक्त काम झाले, तर तीच खरी श्रद्धांजली ठरेल.”

यंदा हवामान बदल, अनियमित पाऊस आणि दुष्काळाचे संकट वाढत असताना अशा भूमिगत रेन गेन बॅटऱ्या प्रत्येक गावात, प्रत्येक शेतात आणि प्रत्येक स्मृतिदिनानिमित्त उभारल्या गेल्या, तर महाराष्ट्रातील कोरडवाहू शेतीला नवे जीवन मिळू शकते, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

१९ जून २०२६ रोजी नान्नज दुमाला येथे होणारा हा उपक्रम भारतातील मृत्यूनंतरच्या धार्मिक विधीला निसर्गसेवा, जलसंवर्धन आणि सर्व सजीवांच्या कल्याणाशी जोडणारा ऐतिहासिक क्षण ठरणार आहे.

स्व. भागीरथी निरदास गवळी यांच्या स्मृतीला ही जलमय, मातीमय आणि जीवनदायी श्रद्धांजली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना मोठा दिलासा; प्रमाणपत्राचा मार्ग मोकळा! फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; थेट खरेदीने एक मुस्त रक्कम स्वीकार अथवा अन्य मार्गांनी दिलेल्या भूस्वामींनाही लाभ