
अहिल्यानगर | प्रतिनिधी|अहिल्यानगर जिल्हा नियोजन समितीवर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते विनायकराव देशमुख यांची नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाने ६ जुलै २०२६ रोजी याबाबतचा आदेश जारी केला.
देशमुख हे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. जिल्ह्याच्या विकासाशी संबंधित विविध विषयांमध्ये त्यांचा दीर्घ अनुभव असून, यापूर्वी त्यांनी जिल्हा विकास समितीचे कार्यकारी सदस्य म्हणूनही काम केले आहे.
२०१० मध्ये तयार करण्यात आलेल्या ‘व्हिजन २०२०’ विकास आराखड्याचे जिल्हा समन्वयक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. त्या आराखड्याचे तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनीही विशेष कौतुक केले होते.
नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना विनायकराव देशमुख म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीवर काम करण्याची संधी दिली आहे. त्यांनी दाखविलेल्या विश्वासाला साजेसे काम करून जिल्ह्याच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.”
पालकमंत्र्यांच्या शिफारशीनुसार आणि अर्थ व नियोजन विभागाच्या मान्यतेनंतर ही नियुक्ती करण्यात आली असून, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी या नियुक्तीला महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.






