
२६ जून २०२६ रोजी अहिल्यानगर येथे ‘जनलोक सूर्यनामा’; केंद्राभिमुख NGI चे RECONSCIO NGI मध्ये रूपांतर करण्याच्या लोकचळवळीचा प्रारंभ
महाराष्ट्रजनलोक प्रतिनिधी | पुणे:- पीपल्स हेल्पलाईनचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. कारभारी गवळी यांनी स्वातंत्र्यानंतरच्या भारताच्या विकासाचा आढावा घेताना सांगितले की, देशाने शिक्षण, पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, तंत्रज्ञान आणि रोजगाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय भौतिक प्रगती साधली आहे. लोकशाही टिकवून संविधानिक संस्था उभारल्या गेल्या आणि सामान्य नागरिकाला मतदान, न्याय व अभिव्यक्तीचे अधिकार प्राप्त झाले. मात्र, झोपडपट्ट्या, जातीयता, धर्माधारित भेद, पैसा, सत्ता आणि प्रतिष्ठेवर आधारित सामाजिक अंतर आजही कायम असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

[आपल्या जीवनातून आणि कार्यातून समाजसेवक अण्णा हजारे यांनी संत ज्ञानेश्वरांच्या “जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात” आणि “चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव” या पसायदानातील संदेशाला प्रत्यक्ष कृतीत उतरवले. राळेगणसिद्धीच्या विकासातून, ग्रामस्वराज्याच्या उभारणीतून आणि भ्रष्टाचारविरोधी लढ्यांतून त्यांनी समाजाला प्रेरणा, मार्गदर्शन आणि जनकल्याणाचा आदर्श दिला. त्यामुळे अण्णांचे कार्य हे पसायदानातील लोकहित, सद्भावना आणि जनजागृतीच्या विचारांचे जिवंत रूप मानले जाते.]
जनलोक महाराष्ट्रशी बोलताना ॲड. गवळी म्हणाले की, ही परिस्थिती केवळ एखाद्या व्यक्तीची, पक्षाची किंवा संस्थेची चूक म्हणून पाहून चालणार नाही. हा मानवी मनातील खोल मानसशास्त्रीय प्रश्न आहे. शिक्षणाला विवेकाची दिशा, कायद्याला नैतिकतेची साथ आणि सत्तेला उत्तरदायित्वाची जाणीव नसेल, तर सुशिक्षित मनही सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा केंद्रित करणारे साधन बनू शकते.
अलीकडे काही मोठ्या सामाजिक-सांस्कृतिक संघटनांबाबत नोंदणी, आर्थिक पारदर्शकता, देणग्या, करपालन आणि सार्वजनिक उत्तरदायित्व यासंदर्भातील प्रश्न पुन्हा चर्चेत आले आहेत. या पार्श्वभूमीवर ॲड. गवळी यांनी सांगितले की, देशात प्रभाव टाकणाऱ्या कोणत्याही मोठ्या संघटनेने आपले कायदेशीर स्वरूप, निधीचे स्रोत, मालमत्ता, करपालन आणि लेखापरीक्षण याबाबत जनतेसमोर स्पष्टता ठेवणे आवश्यक आहे. हा प्रश्न कोणत्याही एका संघटनेपुरता मर्यादित नसून लोकशाहीतील सर्व प्रभावशाली शक्तींना लागू होतो.
“सत्ता केंद्रित ठेवून जबाबदारी मात्र अस्पष्ट ठेवणाऱ्या रचना लोकशाहीच्या आत्म्यासाठी धोकादायक ठरू शकतात,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
ॲड. गवळी यांच्या मते, भारताच्या संविधानाला आज केवळ बाह्य कायदेशीर चौकटीची नव्हे, तर आंतरिक नैतिक व मानसशास्त्रीय प्राणशक्तीची गरज आहे. संत ज्ञानेश्वरांचे पसायदान हे केवळ भक्तिपूर्ण प्रार्थना म्हणून न पाहता आत्मपरिवर्तन, समाजपरिवर्तन आणि संविधानाला प्राणशक्ती देणारी मानसशास्त्रीय जीवनपद्धती म्हणून समजण्याची वेळ आली आहे.
२६ जून २०२६ रोजी अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आलेला “जनलोक सूर्यनामा” हा भारताची NGI एका दिवसात बदलली, अशी घोषणा करण्यासाठी नसून भारतीय समाजातील केंद्राभिमुख भावनिक NGI चे केंद्रोत्सारी RECONSCIO NGI मध्ये रूपांतर घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय लोकचळवळीचा प्रारंभ म्हणून साजरा केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या आंदोलनासाठी ॲड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, ॲड. अमित थोरात, शाहीर कान्हू सुंबे, ॲड. लक्ष्मणराव पोकळे, वीरबहादूर प्रजापती, संतोष खामकर, ओम कदम, पोपट शेळके, धनंजय मडके, कैलास पठारे, ॲड. विद्या शिंदे, राजेंद्र कर्डिले, दिलीप घुले आणि प्रकाश गोसावी आदी कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.
“ओळखा – तपासा – बदला” या सूत्रातून मनातील स्वार्थी आणि केंद्राभिमुख माहिती ओळखून ती संविधान, विज्ञान, विवेक आणि पसायदानाच्या प्रकाशात तपासण्याचे, तसेच तिचे सर्वकल्याणकारी RECONSCIO जीवनशक्तीत रूपांतर करण्याचे आवाहन त्यांनी केले.
“हीच संविधानाला प्राणशक्ती, हीच पसायदान भारताची जनलोक दिशा आणि हीच दुसऱ्या महाभारतावर मानवतेची विजयघोषणा आहे,” असे सांगत त्यांनी आपल्या भाषणाचा शेवट “डिच्चू फत्ते !” या घोषणेने केला.





