पुणे–अहिल्यानगर–बीड मार्गावर ‘पसायदान एक्सप्रेस’ सुरू करा!

१९ जुलैच्या दिल्ली गेट सत्याग्रहात मागणी; बीडच्या दारिद्र्यनिर्मूलनासाठी रेल्वे ठरणार विकासाची जीवनवाहिनी

अहिल्यानगर (प्रतिनिधी) — “रेल्वे केवळ प्रवासाचे साधन नाही; ती संधी, ज्ञान, आरोग्य आणि आर्थिक न्यायाची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे पुणे–अहिल्यानगर–बीड मार्गावर दररोज नियमित रेल्वे सेवा सुरू करून तिला ‘पसायदान एक्सप्रेस’ असे नाव द्यावे,” अशी मागणी पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसद यांच्या वतीने करण्यात आली आहे.

ही मागणी रविवार, १९ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता अहिल्यानगर येथील ऐतिहासिक दिल्ली गेट येथे आयोजित ‘पसायदान राष्ट्रीय धारणा सत्याग्रहात’ केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयासमोर ठेवण्यात येणार आहे.

पुणे–अहिल्यानगर–बीड रेल्वेमार्ग उपलब्ध असल्याने या मार्गावर तातडीने थेट प्रवासी रेल्वे सुरू करणे शक्य आहे. बीड हा दीर्घकाळ विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेला जिल्हा असून, तेथील दारिद्र्य, बेरोजगारी, स्थलांतर, शिक्षणाची मर्यादित उपलब्धता आणि आरोग्यसेवांवरील ताण कमी करण्यासाठी ही रेल्वे सेवा अत्यंत उपयुक्त ठरेल.

पीपल्स हेल्पलाईनचे अध्यक्ष ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी म्हटले आहे की, बीडमधील विद्यार्थी, शेतकरी, कामगार, रुग्ण, छोटे व्यापारी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांना पुणे व अहिल्यानगर येथील शिक्षण, आरोग्य, रोजगार, उद्योग आणि बाजारपेठांशी थेट जोडणे आवश्यक आहे. ‘पसायदान एक्सप्रेस’ सुरू झाल्यास बीड जिल्ह्यातील मानवी क्षमता, शेतीमाल, लघुउद्योग आणि स्थानिक व्यापाराला व्यापक बाजारपेठ उपलब्ध होईल.

ही रेल्वे सेवा केवळ तीन शहरांना जोडणारी नसून, मराठवाड्याला ज्ञान, कौशल्य, उपचार, रोजगार आणि आर्थिक संधींशी जोडणारी सामाजिक न्यायाची वाहिनी ठरेल. बीडमधील युवकांना शिक्षण आणि नोकरीसाठी सुलभ प्रवास करता येईल, रुग्णांना मोठ्या रुग्णालयांपर्यंत पोहोचणे सोपे होईल आणि शेतकऱ्यांना आपला माल मोठ्या बाजारपेठेत नेण्याची संधी मिळेल.

‘पसायदान’ ही संकल्पना सर्वांच्या कल्याणाची, दुःखनिवारणाची, मैत्रीची आणि ज्ञानाच्या प्रसाराची आहे. त्यामुळे या रेल्वेला ‘पसायदान एक्सप्रेस’ नाव देणे हे केवळ नामकरण नसून, मागास भागाला विकासाच्या केंद्रांशी जोडण्याच्या लोककल्याणकारी शासनदृष्टीचे प्रतीक ठरेल.

अ‍ॅड. गवळी पुढे म्हणाले की, “बीडला दयेची नव्हे, तर संधीची गरज आहे. दारिद्र्य हटविण्यासाठी केवळ अनुदाने पुरेशी नाहीत. शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि बाजारपेठांपर्यंत पोहोच देणारी सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करावी लागेल. पुणे–अहिल्यानगर–बीड ‘पसायदान एक्सप्रेस’ ही त्यासाठी निर्णायक पायरी ठरू शकते.”

या रेल्वेमध्ये सर्वसामान्यांसाठी परवडणारे अनारक्षित डबे, विद्यार्थ्यांसाठी सवलती, रुग्ण व ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक सुविधा आणि सकाळी पुण्याकडे व संध्याकाळी बीडकडे परतीची सोयीस्कर वेळ ठेवावी, अशीही मागणी सत्याग्रहातून केली जाणार आहे.

या सत्याग्रहात संघटनेचे कार्यकर्ते ॲड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, शाहीर कान्हू सुंबे, ॲड. लक्ष्मणराव पोकळे, वीरबहादूर प्रजापती, संतोष खामकर, ओम कदम, पोपट शेळके, धनंजय मडके, कैलास पठारे,राजेंद्र कर्डिले, दिलीप घुले आणि प्रकाश गोसावी अनिल घाट विसावे संजय देवढे आदी कार्यकर्ते सहभागी आहेत.

“पुण्याचे ज्ञान, अहिल्यानगरची मध्यवर्ती जोडणी आणि बीडची मानवी व कृषी क्षमता यांचा संगम घडविणारी ‘पसायदान एक्सप्रेस’ तातडीने सुरू करा,” असे आवाहन पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना मोठा दिलासा; प्रमाणपत्राचा मार्ग मोकळा! फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; थेट खरेदीने एक मुस्त रक्कम स्वीकार अथवा अन्य मार्गांनी दिलेल्या भूस्वामींनाही लाभ