डॉ. कुमार सप्तर्षी यांना विनम्र अभिवादन

अहिल्यानगर, प्रतिनिधी : ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, माजी आमदार, युवक क्रांती दलाचे (युक्रांद) संस्थापक आणि सामाजिक परिवर्तनाचे अथक योद्धे डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनाबद्दल पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने तीव्र शोक व्यक्त करण्यात आला. त्यांच्या निधनाने समाजवादी, लोकशाहीवादी आणि परिवर्तनवादी चळवळीतील एक निर्भीड, अभ्यासू व संघर्षशील नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
पीपल्स हेल्पलाईनचे कार्यकर्ते अॅड. कारभारी गवळी, प्रकाश थोरात, अशोक सब्बन आणि अॅड.अमित थोरात यांनी संयुक्त शोकसंदेश प्रसिद्ध करून डॉ. सप्तर्षी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
शोकसंदेशात म्हटले आहे की, डॉ. कुमार सप्तर्षी यांनी आयुष्यभर सत्य, सामाजिक न्याय, लोकशाही मूल्ये, संविधान आणि मानवतेच्या विचारांचा पुरस्कार केला. जात, धर्म, पंथ आणि पक्ष यांच्या पलीकडे जाऊन त्यांनी वंचित, शोषित आणि दुर्बल घटकांच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष केला. युवकांमध्ये सामाजिक बांधिलकी, विवेक, वैज्ञानिक दृष्टीकोन आणि परिवर्तनाची जाणीव निर्माण करण्यासाठी त्यांनी युवक क्रांती दलाच्या माध्यमातून केलेले कार्य सदैव प्रेरणादायी राहील.
त्यांनी अन्याय, भ्रष्टाचार, अंधश्रद्धा, असमानता आणि सामाजिक विषमता यांच्याविरोधात निर्भीड भूमिका घेत समाजमनाला जागृत केले. ग्रामीण भागापासून ते राज्याच्या राजकारणापर्यंत त्यांनी आपल्या विचारांचा प्रभाव निर्माण केला. समाजातील प्रत्येक घटकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, ही त्यांची भूमिका आयुष्यभर ठाम राहिली.
पीपल्स हेल्पलाईनच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे की, आज समाजाला विवेकनिष्ठ, संविधाननिष्ठ आणि परिवर्तनवादी नेतृत्वाची गरज अधिक आहे. अशा काळात डॉ. सप्तर्षी यांचे विचार आणि कार्य पुढील पिढ्यांसाठी दिशादर्शक ठरणार आहे. त्यांच्या सामाजिक योगदानाची परंपरा जपणे आणि त्यांनी दिलेल्या मूल्यांचा प्रसार करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
अॅड. कारभारी गवळी यांनी सांगितले की, “डॉ. कुमार सप्तर्षी यांनी सामाजिक न्याय, लोकशाही आणि मानवी मूल्यांसाठी दिलेला लढा पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील. त्यांचे विचार हेच त्यांच्या कार्याचे खरे स्मारक आहे.”
प्रकाश थोरात यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले की, “समाजातील अन्यायाविरोधात निर्भीडपणे आवाज उठविण्याचे धैर्य डॉ. सप्तर्षी यांनी अनेक कार्यकर्त्यांना दिले. त्यांचे जीवन संघर्ष, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकीचे आदर्श उदाहरण आहे.”
अशोक सब्बन यांनी म्हटले की, “समाजवादी विचारसरणीचा दीपस्तंभ हरपला असला तरी त्यांची वैचारिक परंपरा समाजाला सतत मार्गदर्शन करत राहील.”
अमित थोरात यांनी सांगितले की, “डॉ. कुमार सप्तर्षी यांचे व्यक्तिमत्त्व हे तरुणांसाठी प्रेरणास्थान होते. त्यांनी दिलेला संविधाननिष्ठ आणि परिवर्तनवादी विचार पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे.”
शेवटी पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने दिवंगत डॉ. कुमार सप्तर्षी यांना विनम्र अभिवादन करण्यात आले असून, त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि असंख्य सहकाऱ्यांप्रती तीव्र शोकसंवेदना व्यक्त करण्यात आल्या. तसेच त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या सामाजिक परिवर्तनाच्या कार्याला पुढे नेण्याचा निर्धारही कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.






