८ ऑगस्ट रोजी ‘जंतर-मंतर क्रांतीदिन’; अहिल्यानगरच्या दिल्ली गेटवर लोकशाहीची ‘जनजागृती अधिसूचना’ प्रसिद्ध होणार

जंतर-मंतर नवी दिल्ली आंदोलन पीपल्स हेल्पलाईनचा एल्गार 

अहिल्यानगर|जनलोक महाराष्ट्र : भारतीय लोकशाही ही निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींची किंवा प्रशासकीय यंत्रणेची खासगी जहागीर नसून, जनता हीच सत्तेची खरी मालक आहे. राज्यकर्ते आणि अधिकारी हे जनतेचे सेवक असून, या घटनात्मक सत्याची पुन्हा जाणीव करून देण्यासाठी शनिवार, ८ ऑगस्ट २०२६ रोजी देशभर ‘जंतर-मंतर क्रांतीदिन’ पाळण्यात येणार असल्याची माहिती पीपल्स हेल्पलाईनचे अध्यक्ष ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.

ते म्हणाले की, ८ ऑगस्ट १९४२ च्या ऐतिहासिक ‘भारत छोडो’ आंदोलनाच्या स्मृती जागवत भारतीय संविधान, लोकशाही आणि कायद्याचे राज्य अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या निमित्ताने पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेच्या वतीने अहिल्यानगर येथील ऐतिहासिक दिल्ली गेट येथे नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांच्या संरक्षणासाठी तसेच शासन-प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात लोकशाहीची ‘जनजागृती अधिसूचना’ प्रसिद्ध करून जनतेसमोर लावण्यात येणार आहे.

या संघटनेचे कार्यकर्ते ॲड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, शाहीर कान्हू सुंबे, ॲड. लक्ष्मणराव पोकळे, वीरबहादूर प्रजापती, संतोष खामकर, ओम कदम, पोपट शेळके, धनंजय मडके, कैलास पठारे,राजेंद्र कर्डिले, दिलीप घुले आणि प्रकाश गोसावी अनिल घाटविसावे संजय देवढे आदी आंदोलनाकरिता सज्ज आहेत प्रयत्नशील आहेत.

लोकशाही केवळ मतदानापुरती मर्यादित नाही

“पाच वर्षांतून एकदा मतदान करणे म्हणजे संपूर्ण लोकशाही नव्हे. मतदानानंतरही वर्षातील ३६५ दिवस लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणेवर लोकशाही मार्गाने जननियंत्रण ठेवणे, सार्वजनिक उत्तरदायित्वाची मागणी करणे आणि संविधानाच्या चौकटीत नागरिक म्हणून सक्रिय राहणे, हा प्रत्येक भारतीयाचा घटनात्मक अधिकार आणि मूलभूत कर्तव्य आहे,” असे ॲड. गवळी यांनी स्पष्ट केले.

त्यांनी पुढे सांगितले की, दिल्लीतील जंतर-मंतरवर प्रज्वलित झालेली लोकशाही संघर्षाची मशाल आता देशातील प्रत्येक गाव, शहर आणि गल्लीबोळात पोहोचली पाहिजे. अन्याय, भ्रष्टाचार, सत्तेचा गैरवापर आणि हुकूमशाही प्रवृत्तींच्या विरोधात नागरिकांनी अहिंसक, सत्याग्रही आणि संविधाननिष्ठ पद्धतीने उभे राहण्याची गरज आहे.

‘दुसऱ्या जनक्रांतीची सुरुवात’

“लोकशाहीतील अंतिम सत्ता जनतेचीच आहे. प्रशासकीय यंत्रणा किंवा निवडून आलेले लोकप्रतिनिधी भारतीय संविधानाची पायमल्ली करीत असतील, तर नागरिकांनी निर्भय, अहिंसक आणि प्रभावी जननियंत्रणाची भूमिका स्वीकारली पाहिजे. हा संघर्ष केवळ एका दिवसापुरता मर्यादित नसून, लोकशाहीच्या पुनरुज्जीवनासाठी सुरू होणारी दुसरी जनक्रांती आहे,” असा ठाम विश्वास ॲड. कारभारी गवळी यांनी व्यक्त केला.

संविधान, कायद्याचे राज्य आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर विश्वास असलेल्या सर्व नागरिकांनी ८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ‘जंतर-मंतर क्रांतीदिन’ उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना मोठा दिलासा; प्रमाणपत्राचा मार्ग मोकळा! फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; थेट खरेदीने एक मुस्त रक्कम स्वीकार अथवा अन्य मार्गांनी दिलेल्या भूस्वामींनाही लाभ