सत्ताधाऱ्यांच्या घराणेशाही आणि धनशक्तीविरोधात जनतेचा एल्गार

लोकभक्ती–ज्ञानभक्ती–कर्मभक्ती हा लोकप्रतिनिधी निवडीचा नवा जननिकष; पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेचे आवाहन


अहिल्यानगर (प्रतिनिधी) : संसदीय लोकशाहीवर धनशक्ती, घराणेशाही, जातीय ध्रुवीकरण, व्यक्तिपूजा आणि राजकीय स्वार्थाचे वाढते वर्चस्व मोडून काढण्यासाठी नागरिकांनी लोकप्रतिनिधी निवडताना "लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्ती" या त्रिसूत्रीचा स्वीकार करावा, असे आवाहन पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेच्या वतीने करण्यात आले आहे.
पीपल्स हेल्पलाईनचे अध्यक्ष ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. कारभारी गवळी यांनी सांगितले की, संविधानाने मतदानाचा अधिकार दिला असला तरी लोकशाहीचे खरे सामर्थ्य जागरूक आणि विवेकी मतदारांमध्ये आहे. त्यामुळे आता केवळ "एक व्यक्ती, एक मत" एवढ्यावर न थांबता "एक जागरूक विवेक, एक जबाबदार मत" हा लोकशाहीचा नवा मंत्र स्वीकारण्याची गरज आहे.

त्यांच्या मते, लोकप्रतिनिधी निवडताना उमेदवाराची जात, धर्म, पक्ष, पैसा किंवा घराणे न पाहता त्याची समाजाप्रती निष्ठा, ज्ञान आणि प्रत्यक्ष कामगिरी तपासली पाहिजे. लोकभक्ती म्हणजे समाज, पर्यावरण, सर्व जीवसृष्टी आणि भावी पिढ्यांच्या कल्याणासाठी निःस्वार्थ भावनेने कार्य करण्याची वृत्ती. ज्ञानभक्ती म्हणजे संविधाननिष्ठा, वैज्ञानिक दृष्टिकोन, कायद्याचे ज्ञान, आधुनिक तंत्रज्ञानाची जाण आणि लोकांच्या प्रश्नांची सखोल समज. तर कर्मभक्ती म्हणजे पारदर्शक, परिणामकारक आणि मोजता येईल अशी लोकहिताची कामगिरी.

ॲड. गवळी यांनी स्पष्ट केले की, लोकशाहीत नागरिक हेच खरे मालक असून लोकप्रतिनिधी आणि नोकरशाही हे जनतेचे सेवक आहेत. त्यामुळे मतदारांनी उमेदवारांना जनतेच्या प्रश्नांसमोर उभे करून त्यांच्या कार्याचा जाब विचारला पाहिजे. केवळ घोषणाबाजी, जाहिरातबाजी आणि भावनिक प्रचारावर विश्वास न ठेवता प्रत्यक्ष कार्याचा हिशोब मागणे हीच खरी लोकशाही असल्याचे त्यांनी नमूद केले.

त्यांनी पुढे सांगितले की, संविधान लोकशाहीची कायदेशीर चौकट देते; मात्र लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्ती ही मूल्ये नागरिकांच्या अंतर्मनात रुजली तर भ्रष्टाचार, घराणेशाही, अज्ञान आणि निष्क्रिय राजकारणाला नैसर्गिकरीत्या आळा बसेल. ही त्रिसूत्री कोणत्याही धर्माशी किंवा विचारसरणीशी मर्यादित नसून जबाबदार नागरिकत्वाची सार्वत्रिक मूल्यव्यवस्था असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेने भारतासह जगभरातील नागरिकांना अधिक उत्तरदायी, ज्ञानाधिष्ठित, पर्यावरणस्नेही आणि जनकेंद्रित लोकशाही उभारण्यासाठी या त्रिसूत्रीचा लोकप्रतिनिधी निवडीचा जननिकष म्हणून स्वीकार करण्याचे आवाहन केले आहे. लोकशाहीचे पुनरुज्जीवन हे केवळ निवडणुकीपुरते मर्यादित नसून जागरूक नागरिक घडविण्याच्या व्यापक सामाजिक चळवळीमधूनच शक्य होईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना मोठा दिलासा; प्रमाणपत्राचा मार्ग मोकळा! फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; थेट खरेदीने एक मुस्त रक्कम स्वीकार अथवा अन्य मार्गांनी दिलेल्या भूस्वामींनाही लाभ